पाठदुखीवर काय उपचार घ्यावे?
पाठदुखीला अस्थिव्यंगोपचार तज्ञांची रोजीरोटी असे गमतीने म्हटले जाते. याचा अर्थ एवढाच की पाठ दुखीवर उपचार घेत राहावे लागतात. शाहरुख खान, सचिन तेंडुलकर यांच्या पाठदुखीमुळे सर्वांना पाठदुखी विषयी जास्त माहिती झाली. पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे व आजारांमुळे पाठ दुखते पाठीचे स्नायू दुखावले तरीही पाठ दुखते विचित्र अवस्थांमध्ये उघडलेल्या स्थितीत काम करणे, मणक्यांच्या हालचालींचा अभाव, मणक्यांच्या पृष्ठभागावर खडबडीतपणा येणे, दोन मणक्यांमधील कुर्चा सरकून मज्जारज्जूवर दाब येणे, तसेच मणक्यांमध्ये अतिरिक्त हाडाची वाढ होणे या सर्वांमुळे पाठ दुखु शकते. काही वेळा नसा दाबल्या गेल्याने मुंग्या येणे, बधिरपणा येणे अशी लक्षणे ही दिसून येतात.
पाठदुखी झाल्यास वेदनाशामके घेणे हा वरवर सोपा पण तात्पुरता परिणाम करणारा उपाय होय. पाठदुखी टाळण्यासाठी उभे राहताना, बसताना, काम करताना शरीराची अवस्था सुयोग्य राहील हे पाहायला हवे. सामान्यतः दिवसभरात अनेक वेळा आपण समोर झुकतो किंवा वाकतो. त्यामुळे पाठ दुखायला लागते. अशावेळी पाठीच्या कण्याला विरुद्ध दिशेने ताण देणारी भुजंगासन, नौकासन अशी आसणे नक्कीच फायदेशीर ठरतात. पाठीच्या कण्यासाठीचे अनेक व्यायाम आहेत. पाठ दुखत असताना हे व्यायाम करू नयेत. पाठीचे व्यायाम हा पाठ दुखी टाळण्याच्या प्रभावी व कायमस्वरूपी इलाज आहे. मंक्यात रचनात्मक बिघाड झाला असेल तर क्वचित पाठ दुखी बरी करण्यासाठी शस्त्रक्रिया ही करावी लागते.